Life Lessons from Space Odyssey
What my favourite film taught me about life
cinema, space-odyssey
2001 A Space Odysseyचा प्रीमिअर आजच्या दिवशी १९६८ साली झाला होता. Spartacus आणि Lolita बनवून क्युबरीकने जगाचं लक्ष स्वतःकडे वेधवून घेतलंच होतं. त्यात १९६४ला शीतयुद्ध पेटलं असताना Dr Strangelove ही अणुहल्ल्याबद्दलची डार्क कॉमेडी फिल्म क्युबरिकने बॉक्स ऑफिसवर हिट करून दाखवली होती. त्यामुळे आता अवकाश आणि चंद्र हे दोन विषय अमेरिकन नागरिकांच्या बोलण्याचा रोजचा विषय झाला असताना काय बघायला मिळणार आहे ह्याची सगळ्यांना उत्सुकता होती.
अपटाउन थिएटर, वॉशिंग्टन. २ अप्टिल १९६८. क्युबरीकआणि वॉर्नर ब्रदर्सच्या आत्तापर्यंच्या सगळ्यात मोठ्या प्रोजेक्टचा प्रीमिअर. १६०मिनिटांचा ओरिजिनल कट दाखवला गेला. (नंतर साधारण १९ मिनिटांचा भाग कट करून revised १४४ मिनिटांची रीळ सगळीकडे पाठवण्यात आली). प्रीमिअर होता म्हणजेच क्रिटिक्स, समीक्षक आणि सिनेमा जगतातली मोठी मंडळी उपस्थित होती.
आणि प्रेक्षकांकडून मिळालेला प्रतिसाद पूर्णपणे अनपेक्षित होता. लोकं सिनेमा चालू असतानाच मधेच उठून जाऊ लागली. न्यूयॉर्क मधल्या एका थिएटरमधून एकूण २५० लोकं सिनेमा सोडून बाहेर गेल्याची नोंद आहे. समीक्षकांनी कुब्रिकचं आणि २००१चं पोटभरून तोंडसुख घेतलं. लोकांना हा नवीन प्रयोग आवडला नव्हता. त्यावेळेच्या सगळ्या मोठ्या वर्तमानपात्रांमधून २००१बद्दलच्या समीक्षणांमध्ये सिनेमा किती बेक्कार, अमानवी, धर्माच्या विरुद्ध, कमी संवाद असलेला, विडंबनात्मक, उपहासात्मक आहे हेच सांगितलं होतं.
काही आठवडे गेले, सिनेमा अजून बॉक्स ऑफिसवर चालूच होता. प्रीमिअरच्या वेळेला उठून न जाणाऱ्यांनी न भूतो न भविष्यती असा अनुभव घेतला होता. २००१ला शिव्या घालणारे अजूनही होते पण अनेकांचं मन बदललं होतं. २००१बद्दल हळूहळू भरभरून लिहून यायला लागलं होतं. लोकांना सिनेमाच्या खोलीचा अंदाज यायला लागला होता. क्युबरीक आणि २००१ बद्दलचं लोकांचं मत पूर्णपणे बदललं.
आणि आज २०२२ मध्ये २००१ अ स्पेस ओडसी हा सिनेमाच्या इतिहासातला महत्वाचा टप्पा मानला जातो. सायन्स फिक्शनचा पाया २००१ने इतका मजबूत बांधला आहे की आज पन्नास वर्षांनंतरही अवकाशासंबंधी असलेल्या कोणत्याही साय-फाय मध्ये २००१ ची छाप दिसल्याशिवाय राहत नाही. अगदी वेलेनव्यूच्या ड्यूनमधेही अनेकदा क्युबरीकन फ्रेम्स, सेट डिजाईन आणि प्रॉप्स दिसून येतात. ड्यून मेन्शन करायचं कारण हे की परवाच ड्यूनला स्पेशल व्हिज्युअल इफ्फेक्टस मध्ये ऑस्कर मिळाला. आणि २००१ला चार नामांकनांमधून मिळालेला एकमेव ऑस्कर म्हणेज व्हिज्युअल इफ्फेक्टस.
२००१चा माझा जीवनावर खूप प्रभाव आहे. सिनेमा बघायचा आणि सिनेमाबद्दल विचार करायचा एक वेगळा दृष्टिकोन २००१ने दिला. ह्या सिनेमाबद्दल जितकं वाचत जातो, बघत जातो तितकं सिनेमा, संगीत, साहित्य आणि जीवन ह्यांबद्दल नवनीवन गोष्टी समजतात. क्युबरीकने सुरवातीच्या समीक्षणांना उत्तर देताना त्यांना ‘dogmatically atheistic and materialistic and earthbound’ म्हटलं होतं. आज अचानक हे आठवलं आणि डोक्यात विचार आला, आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी करतो आहे. अजून पन्नासेक वर्ष आयुष्य पडलं असेल, त्यातसुद्धा खूप काही करायचं आहे. अनेक लोकं भेटतील. काही जवळची होतील काही लांबच राहतील काही विरुद्ध टोकालाच राहतील. आणि भेटलेला प्रत्येक माणूस बोलेल, टीका करेल. आपण क्युबरीकसारखं करायचं. आपल्या कामात जे बदल वाटतील ते करत राहायचे आणि लोकांना बोलू द्यायचं. आपला मॅग्नम ओपस दुसऱ्यामुळे खाली पडू द्यायचा नाही.