My best writing piece yet.

I consider this piece as my magnum opus.

history, philosophy, paintings


भाग १: फ्रेंच राज्यक्रांती आणि कला

गेल्या वर्षी अचानक फ्रेंच राज्यक्रांतीबद्दल उत्सुकता निर्माण झाली आणि सलग दोन-तीन महिने इंटरनेट वर फ्रेंच राज्यक्रांतीबद्दल मिळेल ते कन्ज्युम केलं. एका रॅबिट होलमधून बाहेर पडतोय तोच दुसऱ्या रॅबिट होल मध्ये गेलो.

ह्या सगळ्यात एक गोष्ट जाणवली ती फ्रांसमधल्या सगळ्या प्रमुख क्रांत्यांमध्ये सर्वसामान्य जनतेचं राजेशाहीविरूद्ध मत बनवण्यात चित्रकलेचा खूप मोठा वाटा होता. जाक् लुई डव्हिड् (Jacques-Louis David), थिओडोर जेरिको (Théodore Géricault), पॉल डेलॉरोच (Paul Delaroche), फ्रान्सिस्को गोया (Francisco Goya) ह्या प्रमुख चित्रकारांनी इतिहास, संस्कृती, आणि वर्तमानातल्या फ्रेंच नागरिकांच्या दृष्टींने महत्वाच्या असणाऱ्या घटनांना कुंचल्याने जिवंतरूप दिले. ह्या चित्रांनी लोकांना राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर विचार करायला भाग पाडलं, क्रांतिकारी आदर्शांना आणि विचारांना पाठिंबा मिळू लागला आणि राजेशाहीविरोधात लोकांमध्ये एकजूट निर्माण झाली.

एक विचार आला, भारतीय स्वातंत्र्य लढ्यादरम्यान असं काही झालं असतं, तर ती कोणती चित्र असती?

गोयाने काढलेल्या “The Third of May, 1808” सारखं जालियनवाला बाग हत्याकांड डोळ्यासमोर ठेवून कोणी चित्र रेखाटलं असतं तर अक्खा पंजाब प्रांत तेव्हाच बंड पुकारून स्वतंत्र झाला असता. दिलाक्वाच्या “लिबर्टी लिडिंग द पीपल’ सारखं भारतमाता तिच्या सुपुत्रांना सोबत घेऊन सत्तावन्नच्या स्वातंत्र्यसमरामध्ये भाग घेऊन लढते आहे दाखवलं असतं तर ‘अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्यसर’ ज्या भाषांमध्ये भाषांतरित नाही झालं त्या भाषा बोलणार्या लोकांमध्ये सुद्धा क्रांतीची आग पेटली असती. मादाम कामांनी श्टुटगार्ट मध्ये भारताचा पहिला झेंडा फडकवला तो क्षण, सावरकरांनी विदेशी कापडाची होळी पेटवली तो क्षण, गांधींनी दांडीमध्ये मूठभर मीठ हातात घेतलं तो क्षण, खुदिराम बोसनी ध्वम (बॉम्ब) फोडला तो क्षण… अशा एक-एक घटना डोळ्यासमोर येत गेल्या.

भाग २: व्हॉट इज वर्थ डायिंग फॉर?

सॉक्रेटिसला अथेनियन तरुणांची माथी भडकावल्याबद्दल आणि अथेनियन देवांवर अविश्वास दाखवल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते.

प्राचीन अथेन्समध्ये आरोपीला स्वतःची शिक्षा स्वतः ठरवण्याची मुभा असल्याने सॉक्रेटिसकडे दोन मार्ग होते. पहिला म्हणजे अथेन्सच्या ज्युरीसमोर त्याची शिकवण, श्रद्धा, तत्वज्ञान, शास्त्र सगळं एक थोतांड असून त्याचा अथेन्सचे नियम, देव ह्यांवर श्रद्धा आहे असं कबूल करणं, आणि हद्दपारी किंवा जन्मठेप ह्यांपैकी एक शिक्षा भोगणं. आणि दुसरा म्हणजे त्याच्या विचारांवर, तत्वज्ञानावर, शिकवणीवर ठाम राहून मृत्यू पत्करणं. सॉक्रेटिसने दुसरा मार्ग निवडला.

आणि ह्याच निर्णयासोबत त्याने शेवटची एक शिकवण दिली. आपली नैतिक तत्वे, श्रद्धा, सद्गुण(virtue, अजून साजेसा मराठी शब्द सापडला नाहीये), आणि तत्वज्ञान ह्यासाठी आपले प्राण सोडणं ही त्याची शेवटची शिकवण. सॉक्रेटिस म्हणतो की प्राण (आत्मा) हा अमर आणि अविनाशी असतो. आत्मा हा तर्क, ज्ञान आणि सद्गुण ह्यांचा पाया आहे. शरीर जरी नश्वर आणि क्षय असताना आत्मा हा शास्वत आणि अक्षय आहे. त्यामुळे सॉक्रेटिस शरीररूपी जरी मेला तरी त्याच्या तत्वांवर ठाम राहून त्याचा आत्मा, आणि त्यामुळेच त्याचं तत्वज्ञान आणि शिकवण अमर राहील.

भाग ३: एपिलॉग

८ एप्रिल १९२९. दिल्लीमधील सेंट्रल लेजिलेटीव्ह असेम्ब्ली हॉल.

आज ब्रिटिश राज ट्रेड युनियन बिल आणि पब्लिक सेफ्टी बिल पास करणार आहे. ट्रेड युनियन बिलने कामगारांचा एकत्र येऊन युनियन बनवण्याचा हक्क काढून घेतला जाईल, तर पब्लिक सेफ्टी बिलने ब्रिटिश सरकारला कोणालाही वॉरंटशिवाय ताब्यात घेण्याचे अधिकार दिले जातील. ब्रिटिशांचा वाढत्या जुलूम आणि अत्याचाराला आता अजूनच चेव चढणार होता. दोन्हीही बिलं आधी रिजेक्ट झाली होती, आणि दोघांनाही बहुमताचा विरोध होता. तरीही त्या विरोधाला न जुमानता ब्रिटिश आज दोन्ही कायदे पास करणार होते.

दुपारचे साडेबारा वाजलेत. हॉल माणसांनी गजबजलाय. जज आणि लेजीस्लेटर्स तर आहेतच पण नवीन ठराव पास होणार म्हणून अनेक पत्रकार सुद्धा आले आहेत. त्यातले काही दुसर्या देशातले किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या वर्तमानपात्रात काम करणारे पत्रकार वाटत आहेत. व्हिजिटर्स गॅलरीमध्येसुद्धा जरा जास्तच गर्दी आहे. तेवढ्यात कानठळ्या बसवणारे दोन प्रचंड आवाज होतात. हॉलमध्ये प्रचंड धूर होतो. काही सेकंद काय झालंय ही कोणालाच समजत नाही. काही जण बसल्या जागेजवळ आडोसा शोधतात तर काही दरवाज्याच्या दिशेने पळ काढतात. तेवढ्यात वरतून कागदांचा वर्षाव व्हायला लागतो. कागदांवर काय लिहिलंय हे धुरातून चाचपडत बघायला कोणालाच वेळ नाहीये. त्याचसोबत दोन आवाज ऐकू येतात. हे आवाज माणसांचे आहेत, आणि दोघेही कुठल्यातरी घोषणा देत आहेत.

हळूहळू धूर कमी व्हायला लागलाय. डोक्यावर कागद पडणं थांबलंय, पण घोषणा तशाच चालू आहेत. आडोशाला लपलेला एक जण तो कागद वाचण्याचा प्रयत्न करतो – “बहिर्यांना ऐकू जाण्यासाठी मोठ्या आवाजाची गरज असते”. तो हळूच आवाजाच्या दिशेने वर बघण्याचा प्रयत्न करतो. धूर खाली कमी झाला असला तरी व्हिजिटर्स गॅलरीजवळ अजून बऱ्यापैकी आहे. त्या धुरात दोघे जण दिसतात. मागच्या खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश आणि समोरून येणारा धूर ह्यामुळे दोघांच्या आकृत्या रेनोसान्समध्ये कोरल्या गेलेल्या ग्रीक देवतांच्या पुतळ्यासारख्या दिसत आहेत. एवढ्या गोंधळात तेच दोघे धीरगंभीरपणे उभे आहेत. एक जण पाच फूट नऊ उंचीचा धिप्पाड आहे तर दुसरा त्याहून जरा लहान. आता काही मिनिटं उलटून गेली आहेत, त्यामुळे पोलीस कोणत्याही क्षणाला येतच असतील. दोघेही घोषणा देणारे अजूनही तसेच आहेत, त्यांच्या घोषणा अजूनच मोठ्या होत जात आहेत –

इन्किलाब जिंदाबाद! इन्किलाब जिंदाबाद! इन्किलाब जिंदाबाद!