Velas Turtle Festival
Afterthoughts experiencing turtle hatching at Velas, Maharashtra
experiences, cinema
'वेळास कासव महोत्सव' हा ऑलिव्ह रिडले ह्या कासवांच्या दुर्मिळ प्रजातीच्या संरक्षणासाठी चालणारा एक मोठा प्रकल्प आहे. साधारण ऑक्टोबर पासून एप्रिल पर्यंत वेगवेगळ्या टप्यांवर हा प्रकल्प रत्नागिरी मधल्या 'वेळास' गावात राबवला जातो.
ऑलिव्ह रिडले जातीची कासवं समुद्रकिनारी अंडी घालून पुढची कसलीही काळजी न करता काहीच आठवड्यात निघून जातात आणि इकडचे ग्रामस्थ त्या अंड्यांची आईपेक्षा जास्त काळजी घेतात. अंड्यातून पिल्लं बाहेर आली की त्यांना लाटांपासून पन्नासेक फूट अंतरावर सोडून देतात. ह्यापुढे पिल्लं जिवाच्या आकांताने लाटांपर्यंत जातात आणि समुद्रात समाविष्ट होऊन जातात.
माझा उत्क्रांतीवादावर बिनअभ्यासाचा आंधळा विश्वास आहे. इतका की डार्विनिजम् कुठे पडताळून बघता येतंय का ह्याचा मी सतत शोध घेत असतो. पिल्लांना लाटांजवळ सोडल्यापासून त्यांचा प्रवास हा एक सोहळा आहे. छोटं कासव धड चालता-बघता येत नसताना लाटांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतं. काही कासवं अर्ध्यातच दम सोडतात, काही पाण्यात गेल्यावर पुन्हा बाहेर येतात आणि काही तर अंड्यातून बाहेरही येत नाहीत. पुढे ह्यांना जलचर खाणार नाहीत आणि हे सुरक्षित राहतील ह्याची काहीही खात्री नाही. तरीही, ह्या सगळ्यावर मात करून, सर्व्हाईव्ह होऊन फिटेस्ट कासवं पुन्हा काही वर्षांनी अंडी घालायला त्याच किनारी येतात जिकडे त्यांचा जन्म झाला होता. धन्य तो निसर्ग आणि धन्य तो डार्विनचा सिद्धांत.
पुढे विचारचक्र सुरू झालं तेव्हा कासवांना मदत करून माणसं निसर्गचक्राला उलटं फिरवण्याचा प्रयत्न करत आहेत, जर कोणत्याही बाह्य गोष्टीशिवाय तग धरून राहिली असती तरच ती खरी फिट वैगरे सुद्धा विचार आले. पण लक्षात आलं की आत्तापर्यंत बाह्य गोष्टींची मदत घेऊनच निसर्गाची वाढ झालीये. सूर्यप्रकाश वापरला नाही तर झाडांना अन्न थोडी बनवता येणार आहे? म्हणजे कोणत्याही स्वार्थाशिवाय निर्मळ मनाने हा प्रकल्प राबवणारे ग्रामस्थ खऱ्या अर्थाने निसर्गाचा भाग झाले आहेत.
सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकरांचा 'कासव' बघितल्यापासून कासव महोत्सवाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. गेल्या शनिवारी हीच गोष्ट प्रत्यक्षात बघायला मिळाली. प्रवासात खूप नवीन लोकं भेटली, गोष्टी समजल्या, आठवणी जमा झाल्या आणि कोकणात अक्खं आयुष्य काढावं असं नव्याने वाटून गेलं.